मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर देण्यात आली आहे. छगन भुजबळ आमच्यासोबत काम करायला तयार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा गट नेता निवडण्यात आधीच उशीर झाला आहे, आणखी उशीर केलं जाऊ नये, राष्ट्रात काँग्रेस पक्षाला उभे करण्याची गरज आहे. असे म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
आधीच उशीर झालाय, अधिक उशीर होऊ नये
काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला आज नागपुरात येत आहे. ते विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना आज भेटणार. काँग्रेस पक्षाच्या नेता निवडी संदर्भात चर्चा करतील. आधीच काँग्रेसच्या विधानसभा गटनेता निवडीला उशीर झालाय. अधिक उशीर होऊ नये. सर्वांनी मिळून एकमताने गटनेता निवडावं. महाराष्ट्रात पक्षाला पुन्हा उभा करण्याची गरज आहे, म्हणून अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय होईल. सभागृहात आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही मुद्दे उचलण्यासाठी सक्षम आहोत. पक्षाचा नेतृत्व संख्येने नसून विचाराने करावा लागतो. मी पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी गटनेता होण्याच्या शर्यतीत आहे की नाही हे मला माहीत नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय करतील त्याला मी स्वीकारेल. परभणी ची घटना सुनियोजित कट होती आणि पोलीस कस्टडीमध्ये ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला ती हत्याच होती. पोलीस त्यास जबाबदार असल्याचा आरोपही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे.