लाडकी बहीण योजनेने राज्यात देवाभाऊचे सरकार आले, हे सत्ताधारी सगळेच मान्य करतात. काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानले. त्यांनी ही योजना पुढील 5 वर्षे कायम राहील अशी ग्वाही सुद्धा दिली. तर योजनेत या योजनेत ज्यांनी घुसखोरी केली, त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण मानधनाची रक्कम दुप्पट कधी होणार याची प्रतिक्षा लाडक्या बहिणींना आहे. त्यावरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
कधी होणार दुप्पट हप्ता?
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाली. सुरुवातीला सरसकट सर्वच महिलांसाठी ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले. 1500 रुपये मानधनाची घोषणा झाली. तर विधानसभा निवडणूक दृष्टीटप्प्यात येताच मानधन 3000 रुपये करण्याचे सुद्धा जाहीर करण्यात आले. राज्याच्या तिजोरीत मोठी गंगाजळी असल्याचा दावा करण्यात आला होता. पण सरकार सत्तेवर आल्यावर या योजनेला मापदंड लागले. निकष जाहीर झाले. त्यात अनेक महिला बाद झाल्या. तर मानधन दुप्पटीचे काय झाले हा प्रश्न सतत विचारण्यात येत होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर दिले. योग्यवेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार असे आश्वासन त्यांनी दिले. आता ती योग्य वेळ कधी येते याची वाट मात्र बहिणींना पाहावी लागेल, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे.
त्या घुसखोर भावांचे थांबवले अनुदान
या योजनेत काही भावांनी घुसखोरी केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलं. या योजनेचा दुरुपयोग करणाऱ्यांचे मानधन थांबवण्यात आल्याचे ते म्हणाले. काहींनी योजनेसाठी थेट दुचाकीचा फोटो लावल्याचा किस्सा ही त्यांनी सांगितला. प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर पात्र असलेल्या बहिणी डावल्या असतील, तर त्यांना लवकरच योजनेचा लाभ देण्यात येईल असे ते म्हणाले.
25 लाख लखपतीदीदी
राज्यातील बचत गटांद्वारे 25 लाख लखपतीदीदी तयार झाल्या आहेत. यंदा आणखी 25 लाख लखपतीदीदी होतील. पुढील काही वर्षांत ही संख्या एक कोटींच्या घरात जाईल. लखपतीदीदी योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महिला बचत गटाच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी यासाठी पहिल्या टप्प्यात 10 मॉल उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.