गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ, परंतु गंभीर विकार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या परिधीय नसांवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायूंची कमजोरी आणि कधीकधी पक्षाघात होतो. पुणे शहरात अलीकडे जीबीएसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंत, पुणे आरोग्य विभागाने 207 प्रकरणांची नोंद केली आहे, ज्यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे सिंहगड रस्त्याच्या परिघापासून 5 किमीच्या परिसरातील आहेत. आता माहिती मिळत आहे की, पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव बराच कमी झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
सोमवार आणि मंगळवारी या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरशी संबंधित एकही नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल झाला नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरातून आमच्याकडे एकही जीबीएसचा रुग्ण आढळलेला नाही. ज्या काही रुग्णांची नोंद झाली आहे ते पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून आहेत.
ताज्या जीबीएस अहवालानुसार, पीएमसीने या महिन्याच्या सुरुवातीपासून जीबीएसचे शून्य रुग्ण नोंदवले आहेत. एकूण 180 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 25 जण अजूनही अतिदक्षता विभागात आहेत, ज्यात 15 जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. मृतांची संख्या 12 आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जीबीएसच्या प्रादुर्भावामुळे 198 हून अधिक लोक बाधित झाले आहेत, त्यापैकी 33 रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत आणि किमान 15 रुग्ण शेजारच्या जिल्ह्यांतील आहेत.
शहराच्या विविध भागांमधून 7,262 पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आणि 144 जलस्रोतांमधील नमुने दूषित आढळले आहेत. घरोघरी जाऊन केलेल्या देखरेखीच्या कामांमध्ये, पीएमसीमध्ये 46,534 घरे, पीसीएमसीमध्ये 29,209 आणि पुणे ग्रामीण भागात 13,956 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अँटीगॅन्ग्लिओसाइड अँटीबॉडीज चाचणीसाठी निमहन्स बेंगळुरू येथे 82 सीरम नमुने पाठवण्यात आले आहेत.