लेखणी बुलंद टीम:
पाकिस्तानला आशेचा किरण दिसला आहे. पाकिस्तानला समुद्रात मोठा साठा सापडला आहे. हा साठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा आहे.पाकस्तानला समुद्रात सापडलेला हा ‘निळा खजिना’ इतका मोठा आहे की त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारू शकते. याशिवाय अनेक देशांतील महागड्या तेलाचा प्रश्नही सुटू शकतो.
पाकिस्तानात सापडलेला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा साठा हा जगातील चौथा सर्वात मोठा साठा असल्याचं बोललं जात आहे. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, गरीब पाकिस्तानचा हा शोध तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. मित्र देशासोबत भागीदारी करून पाकिस्तानने हा प्रचंड साठा शोधला आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक सर्वेक्षणातून या ठिकाणाची ओळख पटली असून संबंधित विभागाने पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात केलेल्या या शोधांची माहितीही सरकारला दिली आहे.
तेल काढण्यासाठी लागणार अनेक वर्षे
‘ब्लू वॉटर इकॉनॉमी’चा फायदा घेण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल ठरवलं जाणार आहे. बिडिंग आणि एक्सप्लोरेशनच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. यावरुन त्याचा आकार निश्चित करण्याचे आणि शोधण्याचे काम लवकरच सुरू होऊ शकते. ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
तेल आणि वायूसह इतर मौल्यवान खनिजे सापडण्याची शक्यता
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व्यतिरिक्त, समुद्रात इतर मौल्यवान खनिजे आणि घटक सापडण्याची शक्यता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली जाणार आहेत.