परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadeo Munde) यांचा 21 महिन्यापूर्वी निर्घुण खून करण्यात आला होता. मात्र आज 21 महिन्यांचा काळ लोटल्यानंतर हि मुंडे परिवाराला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता उद्या (गुरुवार, 31 जुलै) दिवंगत महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सर्व कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. यासाठी आज सायंकाळी मुंडे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बारा गुंठे जमिनीसाठी महादेव मुंडे यांचा खून
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे कुटुंबीयांना उद्या मुंबई येथे भेटीसाठी बोलावले आहे. याआधी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन वेळेला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर परळी येथे भर पावसात रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते. अशातच काल (मंगळवारी) आमदार रोहित पवार यांनी परळीत महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. मुंडे कुटुंबीयांकडून संपूर्ण प्रकरणाची माहितीही घेतली. यावेळी ते म्हणाले कि, महादेव मुंडे यांचा खून बारा गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन कराड याला घ्यायची होती. श्री कराड हे वाल्मीक कराड यांचे चिरंजीव आहेत, असा मला कळालं. जमिनीचा वाद वाढत गेला पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितली.
गित्ते यांच्यासह आणखी काही जणांनी महादेव मुंडेंना वाईट पद्धतीने मारलं
श्री व सुशील कराड असे दोन वाल्मीक कराडचे मुलं आहेत. त्याचबरोबर गोट्या गित्ते यांच्यासह आणखी काही जणांनी महादेव मुंडेंना वाईट पद्धतीने मारलं. त्यावेळी गळ्याजवळचा तुकडा काढण्यात आला हे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील समोर आल आहे. कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत. त्यांनी हा तुकडा कराडच्या समोर ठेवण्यात आल्याचे सांगितलं, ही सर्व बाबा मला आज मुंडे कुटुंबाकडून सांगण्यात आली असेही ते यावेळी म्हणाले.
सुप्रिया सुळे या प्रकरणाबाबत माहिती घेत आहेत, जितेंद्र आव्हाड यांनी देखील अधिवेशनात याचा पाठपुरावा केलाय. सर्व जाती-धर्माचे लोक या परिवारात सोबत आहेत. एसपींना बोलल्यावर आमचे समाधान झाले नाही. पुरावे असतानाही अद्यापही आरोपी अटक नाही. या प्रकरणात सीडीआर काढण्यासाठी कुटुंबाला खर्च करावा लागला, हा खर्च सरकारने न करता सतीश फड यांनी बहिणीला न्याय मिळावा, यासाठी दीड लाख रुपये खर्च करून हा डाटा काढला होता. बांगर यांनी या प्रकरणाचे फोटो दाखवले होते, ते अत्यंत वाईट पद्धतीने मारलेले फोटो होते. संतोष साबळे नावाचे पीआय आहे, त्यांना या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीमध्ये घेण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचे अधिकार आयजीकडे असल्याने आयजींना देखील मी बोललो. ते सुट्टीवर असल्याने सध्याच्या असलेल्या उमप यांच्यासोबत माझी चर्चा झाली. रश्मी शुक्ला यांच्याकडे आता मी संतोष साबळे यांची नियुक्ती करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.