भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी पार झाली. त्यानिमित्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे अनन्यसाधारण अप्रूप वाटून तो समाज आपसूकच आनंदसोहळ्यात तल्लीन होणे स्वाभाविक आहे. ज्यांच्या वाडवडलांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊन खस्ता खाल्ल्या असे स्वातंत्र्यप्रेमी स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास स्मरण करत असताना मनोमन सुखावलेले दिसतात; तर या विपरित असेही ढोंगी स्वातंत्र्यप्रेमी उरबडवे, कर्जबुडवे,परान्ने बडवे आघाडीवर आहेत, जे स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही नसल्याचा त्यांच्या माथी कलंक असल्याचे शरसंधान वारंवार होत आलेले आहे. आनंदाने पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराच्या समोर अलगद उभं राहून माकडानं मोराला झाकोळून टाकत मर्कटलीलेतून स्वातंत्र्याचा अपलाप करावा. समता, बंधुता स्वातंत्र्याचा गळा घोटणारी विषमतावादी विखारी विचारधारा कुरवाळत राहणे ज्यांचे जीवितकार्य राहिलेले आहे असेही दुर्जन या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव पर्वाला अमृतकाळ मानताना मोक्याच्या
प्रसंगी चव्हाट्यावर दिसतात. तर अलिकडेच नऊ-दहा वर्षापूर्वी खरे स्वातंत्र्य मिळाले या आविर्भावात रमणारे महाभाग सेल्फीचा आनंदकल्लोळ करतानाही थकत नाही याचेही नवलच वाटावे. पण स्वार्थापुरता स्वातंत्र्याचा अर्थ लावणाऱ्यांचे कान टोचताना डॉ. राममनोहर लोहिया म्हणतात, “येथे आमच्या देशात सध्या नागरिक स्वातंत्र्यतेचे धार्मिक, राजकीय व आर्थिक स्वरूपात वर्गीकरण करण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्यावर विचार करणे योग्य होईल. हे स्पष्ट आहे की, असे वर्गीकरण करणे हे खोट्या समजुतीवर आधारित आहे. नागरिक स्वातंत्र्यता धार्मिक, राजकीय किंवा आर्थिक नसते. त्याची अशी विभागणी केली जाऊ शकत नाही. नागरिक स्वातंत्र्याचा प्रश्न जेव्हा उभा ठाकतो तेव्हा सरकार आपल्या वर्तणुकीतून किंवा गैरवर्तुणकीतून (कारवाई करून किंवा चुप्पी साधून) नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करीत नाही. नागारिक स्वातंत्रतेचे उल्लंघन तेव्हाच होते जेव्हा सरकार नागरिकांच्या विचार व मत अभिव्यक्ती व सभा संघटनांच्या स्वातंत्र्यांवर हल्ला करते किंवा त्यांच्या गुंडांना तसे करण्याची मुभा दिली जाते. अशाप्रकारच्या सरकार पुरस्कृत हिंसा किंवा गुंडागिरीला टीकेची किंवा विद्यमान कायदा व सरकारच्या विरोधात बंडाची भीती सतावत राहते. (पृ.१४,१५; नागरिक स्वतंत्रता काय आहे? डॉ राममनोहर लोहिया) नागरिक स्वातंत्र्य अभिन्न असले तरी भारतीय समाजव्यवस्था ज्याप्रकारे विषमतेने बरबटलेली आहे, त्याचा विचार करता स्वातंत्र्याचे विविध पैलू ध्यानात घेतल्याविना गत्यंतर नाही. ब्रिटीश राज्य गेले. राजकीय स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या राजवटीतून देश एतदेशीय सत्ताधाऱ्यांच्या मुठीत आला. सांविधानिक दिशानिर्देशानुसार राज्य चालत आहे. पण देशाला स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक लोकशाहीसह ज्या ‘एकमय राष्ट्र’ संकल्पनेची राजकीय स्वातंत्र्यानंतर अपेक्षा होती, त्या संकल्पनेचे काय झाले? महात्मा फुले म्हणाले होते,”…आर्यांच्या खोडसाळ मतलबी धर्मावरून धूर्त आर्यभट ब्राह्मण अज्ञानी शूद्रास तुच्छ मानितात. अज्ञानी शूद्र, अज्ञानी म्हारांस नीच मानितात आणि अज्ञानी महार मांगास नीच मानितात. त्यांतून अति सोवळे धूर्त आर्यभट ब्राह्मण शूद्रादि अतिशूद्रांस नीच मानून आपण तर नाहींच, परंतु त्या सर्वांमध्ये आपआपसांत रोटीव्यवहार व बेटीव्यवहार होऊं देण्याविषयीं त्यांनी प्रतिबंध केल्यामुळे अर्थातच त्या सर्वांमधले भिन्न भिन्न प्रकारचे आचारविचार, खाणें-पिणें , रीतिभाती एकमेकांच्या एकमेकांशी मिळत नाहीत. अशा अठरा धान्यांची एकी होऊन त्याचें चरचरीत कोडबुळें म्हणजे एकमय लोक “Nation” कसें होऊं शकेल ? अरे , हे धूर्त आर्यभट ब्राह्मण एकंदर सर्व जगांतील लोकांस तुच्छ मानून त्यांचा मनापासून हेवा व द्वेष करणारे आहेत . (पृ.५२१,सार्वजनिक सत्य धर्म,म.फु.स.वा.) सुमारे दिडशे वर्षापूर्वी मांडलेली समाजाची व्यथा आजादीचे अमृतमहोत्सव वर्ष सरले तरी रुप पालटून कायम दिसते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले तरी सामाजिक विषमता, सांस्कृतिक कुरघोडी, धार्मिक गुलामगिरी याबाबत आजही काय चित्र दिसते? जातीयता, उच्चजातवर्चस्व, पुरुषसत्ताकता, धर्मांधता ह्यांचा मूलाधार धर्मव्यवस्था आणि धर्मशास्त्रातून हजारो प्रवाहित होत आहे. निरंतर वाहत आहे. त्याचा मुकाबला राज्याला(राजकीय व्यवस्थेला) कसा करता येईल?
हजारों वर्षापासून धार्मिक गुलामगिरीतून मुक्तीसाठी अवैदिक जनसमूह संघर्षरत आहेत. धार्मिक स्वातंत्र्यासाठी उद्रेक होत आलेले आहेत, आजही त्यातील नियमितता कायम आहे. “सनातनम (सनातन धर्म) हा कोरोना व्हायरस, मलेरिया किंवा ताप यांसारख्या आजारासारखा असून त्याचा विरोध करण्यात अर्थ नसून त्याचे निर्मूलन करायला हवे,” (दै.सकाळ,४ सप्टेबर २०२३) असे वक्तव्य तामिळनाडूचे युवककल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी एका कार्यक्रमात केले. सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात असून त्याचे निर्मूलन करायला हवे. असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचे पूत्र उदयनिधी यांना वाटते. सनातन धर्म हा जातीव्यवस्थेच्या नावाखाली लोकात फूट पाडत असून, विधवांना सती जायला भाग पाडले, बालविवाहाला प्रोत्साहन दिले. असा हल्ला त्यांनी सनातन धर्मावर केला.
अशा अन्याय्य धर्मसूत्राचा बीमोड करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची नितांत गरज असते. करुणानिधी यांनी कायदा आणून सर्व जातीच्या व्यक्तींची मंदिरांमध्ये पुजारी म्हणून नेमण्यास सुरुवात केली.याचे स्मरणही त्यांनी करुन दिले. ब्राम्हणेतरांना-ओबीसींना बरोबरीचे न समजणाऱ्यांच्या नाकावर लिंबू टिच्चून तामिळनाडूत स्टॅलिन या मुख्यमंत्र्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांची मिरासदारी मोडून काढ़त ओबीसी पुजारी नेमण्याची तयारी केली. ही खूप महत्वपूर्ण घटना म्हणता येईल. महाराष्ट्रात देखील ब्राह्मण पुरोहिताशिवाय लग्न वास्तु दशक्रिया आदि विधी करण्याचा प्रघात सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून रुढ झाला. अलीकडे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील पंड्यांचा प्रभाव मोडून काढत ब्राम्हणेतर पुजारी नेमले जात आहेत. हे धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढणारे समतेसाठी आरक्षणच होय. देवालयात एकाच जातीचे पुजारी न नेमता हिंदु धर्मातील कोणत्याही जातीचे पुजारी नेमणूक करणे म्हणजे एकप्रकारे समान नागरी कायदा म्हणता येईल, की नाही? ही प्रक्रिया अधिक गतीने व व्यापकपणे पुढे जायला हवी. ओबीसींना हिंदु म्हणून, समानतेच्या अंगाने मानत असताना, सर्व क्षेत्रात ब्राम्हणांना जो मानपान-मानधन, पद-पत-प्रतिष्ठा मिळते, ते सर्व ओबीसींना मिळायला पाहिजे. ही खरी हिंदु एकता अन् समता असेल. यासाठी ओबीसींचा सामाजिक न्यायासाठी लढा आहे, ओबीसी जनगणनेची मागणी त्या लढ्याची अपरिहार्यता आहे.
गावातल्या बाया मजुरीला जाताना मारुतीच्या मंदिराच्या पायरीजवळ पायताणं काढून तिथूनच हात जोडून रानोमाळी जायला निघतात.असा पायंडा कसा पडला असेल? अनेक मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध केलेला असतो. अनेक प्रसंगी पूजा विधी करताना महिला नारळ फोडत नाही. ही प्रथा स्त्रियांना कोणत्या अधिकारापासून वंचित ठेवते? अशा बंधनाने स्त्रियांच्या कोणत्या स्वातंत्र्याचा संकोच होत असेल? हा निश्चितच सखोल संशोधनाचा विषय आहे. गतवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) एका कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून घेतात. तेव्हा ही घटना धार्मिक अधिकाराच्या दृष्टीने, फार महत्वाची ठरते. एखाद्या घटकराज्याचे प्रमुख राजकीय पुढारी मीपणाची झूल फेकून अशी भूमिका घेतात तेव्हा त्या कृत्याला समाजाची अधिमान्यता मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन लढ्याचे वैभव ध्यानात येते. “ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादिक लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज तारीख २४ माहे सप्टेंबर सन १८७३ इसवी रोजी स्थापन केला.”(पृ.२०५,पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, महात्मा समग्र वाङ्मय, सं हरी नरके,महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई,२०१३) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची मांडलेली सुत्रे धर्मस्वातंत्र्याचा आविष्कार होय. पुरोहितशाहीच्या वरवंट्याखाली दबलेले धार्मिक अधिकार आणि शुद्रातिशुद्रांना आर्यांच्या खोडसाळ मतलबी धर्माच्या जाळ्यात अडकवून होणाऱ्या शोषणाविरुधची ललकारी, धर्मचिकित्सेतून स्त्रीशुद्रातिशुद्रांचा उजागर झालेला सांस्कृतिक वारसा आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वपूर्ण मानण्यात येतो. करवीर संस्थानात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सत्यसमाजी विचाराची कास धरून राज्यकारभार चालविला त्याची मधूर फळं महाराष्ट्राला चाखता आली. ब्राम्हणेतर चळवळीचा सर्वाधिक प्रभाव तामिळमनावर ठसला. मराठी मातीत पेरलेल्या सत्यशोधकी विचाराचे भरघोस पीक तामिळनाडूत हाती आले. पेरियार रामास्वामी यांनी अजोड कष्टाने ब्राह्मणेतर लढ्याचा मळा द्रविड चळवळीच्या आवृत्तीतून तामिळ जनतेच्या मनमनात फुलवला. त्यातून तामिळनाडूचे सामाजिक सांस्कृतिक राजकीय वेगळेपणे ठसठशीतपणे पुढे येते. उदयनिधी सारखे नवपिढीतील नेत्रुत्व त्या दिशेने झेपावते. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना उदयनिधीची बोचरी अभिव्यक्ती आणि उदयनिंधीचा होत असलेला धिक्कार; उदयनिधींवर देशद्रोहाचा वगैरे शेरा मारुन पुढे निघणे हितावह आहे की, त्यावर चिंतन होणे? “…एकंदर सर्व आर्यभट ब्राह्मण आपले थोतांडी ग्रंथ एके बाजूला फेकून एकंदर सर्व मानव स्त्रीप्राण्यांबरोबर सत्य वर्तन जेव्हां करू लागतील, तेव्हां जगांतील एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुष आर्याचें कल्याण व्हावें, म्हणून आपणां सर्वांच्या निर्मीकाच्या पदापाशीं लीन होऊन त्यांजविषयीं मनःपूर्वक प्रार्थना करतील, यांत कांही संशय नाहीं…” (पृ.५२५ सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक,महात्मा फुले समग्र वाङ्मय, सं.हरी नरके,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,२०१३) धर्माच्या बुरख्याआडून वर्णजातसमर्थक एकप्रकारे स्वातंत्र्याचा तिरस्कार करतात त्यांच्यासाठीही काही फार सुखदायक नाही, शुद्रातिशुद्रांना जसजसे समाजभान येईल तसे धर्मस्वातंत्र्याचा लढा सशक्त होऊन पुरोहितशाहीला मूठमाती दिल्याशिवाय सर्व मानवसमूहाचं कल्याण होऊ शकणार नाही. सत्यशोधक विचार सूत्रांतून दिलेला हा देशोद्धाराचा संकल्प होय. आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना पुरोहितधार्जिण्या धार्मिक गुलामगिरीविरुद्ध आविष्कार होणे यातून सत्यशोधक तत्वज्ञानाची अपरिहार्यता अधोरेखित होते.