परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकरणात पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं, या आंदोलकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता, मात्र सोमनाथ सूर्यवंंशी यांचा कोठडीतच मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे वातावरण तापलेलं असतानाच आता संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी हा मनोरुग्ण असल्याच समोर आलं होत. आता या आरोपीला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच त्याला अल्कोहोलिक डिसऑर्डर हा आजारही झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर अकोल्यातील केळकर हॉस्पिटल या मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तो सप्टेंबर आणि नोव्हेंबर असे दोन महिने केळकर हॉस्पिटलच्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती होता. या मनोरुग्ण आरोपीने परभणीत संविधान शिल्पाची विटंबना केल्यानंतर राज्यभरात आंदोलन पेटलं होतं. दरम्यान आता त्याला असलेल्या आजारांबद्दल केळकर हॉस्पिटलच्या डॉक्टर राधिका केळकर यांनी माहिती दिली आहे.
राहुल गांधींनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट
दरम्यान सोमवारी राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची परभणीमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के ही हत्याच आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झाला. सोमनाथ सूर्यवंशी हा दलित असल्यामुळे त्याला मारण्यात आलं असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला होता. तर राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी हे केवळ द्वेषाचं राजकारण करण्यासाठीच महाराष्ट्रात आले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.