लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचे ब्लेडने गुप्तांग कापले, नर्सच्या हिंमतीमुळे मोठा अनर्थ टळला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्यानंतर देशभरात आंदोलने केली जात आहेत. रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टर, नर्स यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यानंतर ऐरणीवर आला आहे. अनेकजण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काळजी व्यक्त करत असताना आता बिहारच्या समस्तीपूर येथे एक खासगी रुग्णालयात नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र पीडित नर्सने आरोपी डॉक्टराचे ब्लेडने गुप्तांग कापले आणि तिथून कसाबसा पळ काढला.

 

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मुसरीघरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरबीएस हेल्थ केअर सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी (दि. ११ सप्टेंबर) नर्स आपले काम आटोपून घरी जाण्याची तयारी करत असताना रुग्णालयाचा प्रशासक आणि डॉक्टर संजय कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी नर्सला पकडून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिघेही आरोपी नशेत असल्याचे पीडितेने सांगितले.

 

पोलिसांनी सांगितले की, ड़ॉ. संजय कुमार आणि इतरांनी नर्सला पकडल्यानंतर तिने ब्लेडने डॉक्टरच्या गुप्तांगावर वार केले आणि तिथून ती कशीबशी निसटली. त्यानंतर रुग्णालयाच्या मागे असलेल्या शेतात लपल्यानंतर तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय कुमार पांडे यांनी माहिती देताना सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. नर्स सुरक्षित आहे की नाही, याची तपासणी केल्यानंतर तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. इतर दोन आरोपींची नावे सुनील कुमार गुप्ता आणि अवधेश कुमार अशी आहेत.

 

संजय कुमार पांडे पुढे म्हणाले, आरोपींनी नर्सवर लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी रुग्णालयाचे दरवाजे आतून बंद केले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. पण तरीही नर्सने या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी जे धाडस आणि प्रसंगावधान दाखविले ते कौतुकास पात्र आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मद्याची बाटली आणि नर्सने वापलेले ब्लेड जप्त केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *