‘द साबरमती रिपोर्ट’, ’12th फेल’ आणि ‘सेक्टर 36’ यासारख्या उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारा अभिनेता विक्रांत मस्सीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. मात्र त्यामुळे एकच खळबळ माजली असून, त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. असं काय लिहीलं होतं त्या पोस्टमध्ये… ?
विक्रांत मस्सी हा बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आत्तापर्यंत एकाहून एक सरस चित्रपटात उत्तम भूमिका केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेला ’12th फेल’ असो कि नुकतेच प्रदर्शित झालेले ‘सेक्टर 36’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं. 12th फेल मधील अभिनयासाठी तर त्याला अनेक पुरस्कारही मिळाले, त्याचं नावं खूपच गाजलं. मात्र, काल 1 डिसेंबरला विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ती वाचून सगळेच हैराण झाले. असं काय होतं त्या पोस्टमध्ये ?
विक्रांत मस्सीची पोस्ट काय ?
खरंतर अभिनेता विक्रांत मस्सीने अभिनयातून ब्रेक घेत इंडस्ट्री सोडण्याबद्दल या पोस्टमध्ये लिहीलं आहे. त्याच्या रिटायरमेंटच्या या घोषणेमुळे अनेक सेलिब्रिटींसह चाहतेही हैराण झाले आहेत. सध्या तो करिअमध्ये चांगलाच यशस्वी ठरत असतानाच विक्रांतने हा निर्णयय जाहीर केल्याने अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहीत हा निर्णय जाहीर केलाय. 2004 साली त्याने टीव्ही शोमधून ॲक्टिंगला सुरूवात केली होती.
विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये लिहीलय.. ‘ नमस्कार, गेली काही वर्ष अतिशय शानदार होती. तुमच्या पाठिंब्यांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण मी जसजसा पुढे जात आहे, मला याची जाणीव होत आहे की एक पती, वडील, मुलगा आणि एका अभिनेत्याच्या रुपात हीच वेळ (पुन्हा सांभाळण्याची) आणि घरी परतण्याची वेळ आहे. 2025 या वर्षांत मी तुम्हाला शेवटचं भेटेन. जोपर्यंत पुन्हा योग्य वेळ येत नाही तोपर्यंत (ही शेवटची भेट असेल.) दोन शेवटचे चित्रपट आणि अगणित आठवणी, सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद ‘ असं विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
पोस्टमुळे चाहते हैराण
मात्र विक्रांतच्या या पोस्टनंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय, त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला असून त्याचे चाहते तर हैराणच झालेत. अनेकांनी त्या पोस्टवर कमेंट करत निराशा जाहीर केली आहे. विक्रांतने असा निर्णय का घेतला, हे तर प्रत्येकालाच जाणून घ्यायचं आहे. तू असं का करतोयस ? तुझ्यासारखा अभिनेता क्वचितच समोर येतो, असं म्हणत एका चाहत्याने त्याला थेट सवाल विचारला आहे. हे खरं नाही, हे खरं नसाव अशी मला अशा आहे, अशा शब्दांत आणखी एका चाहत्याने त्याचं दु:ख व्यक्त केलंय.
गेल्या वर्षीच विक्रांतचा ’12वी फेल’ रिलीज झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. त्यातील त्याच्या अभिनेयाचे खूप कौतुक झाले. तर नुकत्याच आलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटासाठी, त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला होता.
धमकीही मिळाली
‘द साबरमती रिपोर्ट’च्या प्रमोशनदरम्यान, विक्रांतने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, चित्रपटात सुरू असलेल्या वादामुळे त्याला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून धमक्या दिल्या जात आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या सर्व धमक्यांमध्ये त्याचा मुलाला लक्ष्य केले जात असल्याचेही त्याने नमूद केलं. विक्रांतने २०१३ मध्ये ‘लुटेरा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यापूर्वी तो टीव्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये कार्यरत होता. 20 वर्षांच्या कारकिर्दीच्या या प्रवासात अभिनेत्याने अनेक उत्तमोत्तम भूमिका प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत.