महाराष्ट्र सध्या प्रचंड तापलाय. तापमानाचा उद्रेक होत असून आता कमाल तापमान पन्नाशीकडे झेप घेत असल्याचे चित्र आहे. आज बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांच्या वर गेलं आहे. हवामान विभागाच्या विशेष तापमान अंदाजानुसार, आज नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा तब्बल 45.3 अंशांवर स्थिरावला आहे. जळगाव, अकोल्यात 43.7 अंशांची नोंद झाली आहे. संपूर्ण राज्यात उष्णतेचा दाह वाढला आहे. दरम्यान, विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रचंड उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. आज कुठे किती पारा आहे? कोणत्या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आलेत? पाहूया सविस्तर..
हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात सध्या विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण राज्यात तापमानाचा उच्चांक झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. अमरावती,यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि बीड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 42.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सामान्यहून अधिक नोंदवण्यात आलंय. किमान तापमानही प्रचंड वाढल्यामुळे सकाळी साधारण 9 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसू लागलाय.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तुमच्या जिल्ह्यात किती तापमान?
संपूर्ण विदर्भात सध्या 40 अंशांहून अधिक तापमानाची नोंद होणार आहे. आजपासून पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस होणार असून तापमानापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मध्य महाराष्ट्रातही सध्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. मराठवाड्यातही प्रचंड तापमान नोंदवले जात आहे.