लातूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक च्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

लातूर शहरातील वसतिगृहात रात्रीचे जेवण घेतल्यानंतर एका सरकारी महाविद्यालयातील सुमारे 50 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक (Puranmal Lahoti Government Polytechnic) च्या वसतिगृहात संध्याकाळी 7 वाजता जेवणासाठी भात, चपात्या, भेंडीकरी आणि मसूर सूप देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

प्राप्त माहितीनुसार, रात्री 8.30 वाजेपर्यंत अनेक विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागली. तसेच काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. या घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घटनास्थळी धाव घेत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डीन डॉ.उदय मोहिते यांना यासंदर्भात माहिती दिली.

आजारी विद्यार्थीनींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत जवळपास 50 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले. रविवारी पहाटे 3 वाजेपर्यंत त्यापैकी 20 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतर 30 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे मोहिते यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ मोहिते यांनी सांगितले की, दोन मुलींना रात्रीच्या जेवणानंतर उलट्या झाल्या. तसेच इतर मुलींनी मळमळ झाल्याची तक्रार केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलींची प्रकृती स्थिर आहे. तथापी, प्राचार्य नितनवरे म्हणाले की, वसतिगृहातील काही विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही तात्काळ तेथे पोहोचलो. सर्व बाधित विद्यार्थीनींना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. कोणत्याही विद्यार्थीनींना धोका होऊ नये म्हणून त्यांची कसून आरोग्य तपासणी केली जात आहे.

या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आल्याचेही प्राचार्य नितनवरे यांनी सांगितले. याशिवाय या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने गोळा केले. नमुन्याचा अहवाल आल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. लातूरचे लोकसभा सदस्य शिवाजी काळगे यांनीही रुग्णालयात जाऊन विद्यार्थीनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *