मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरात आज सकाळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक (Truck Hits Bike) दिली. या अपघातात (Accident) एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. मुलगी वडिलांसोबत शाळेत जात असताना ओबेरॉय मॉल (Oberoi Mall) जवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गोरेगाव परिसरात आज सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, यात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. तसेच या मुलीचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेली मुलगी आपल्या वडिलांसोबत शाळेत जात. होती. परंतु, ओबेरॉय मॉलजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघातात मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या वडिलांना दुखापत झाली आहे. मृत मुलीच्या वडिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशात एका विद्यार्थीनीचा ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. मेढा परिसरातील प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील टिकुरी सामन गावाजवळ एका वेगवान, ओव्हरलोड ट्रकने मागून धडक दिल्याने 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला होता.
प्राप्त माहितीनुसार, मुलगी कॉलेजमधून सायकलवरून घरी परतत असताना हा अपघात झाला होता. अतिरिक्त डीसीपी अभिजीत कुमार यांनी सांगितले की, या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव सरस्वती मिश्रा असं आहे. ती इयत्ता 11 मधील विद्यार्थिनी होती. ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच सरस्वतीसोबत असलेल्या दुसऱ्या मुलीचा हात ट्रकच्या मागील चाकाखाली अडकला होता. तिला वाचवण्यासाठी 30 मिनिटे लागली. तिला जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.