राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या भेटीत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला. सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या. “ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार. कोणाविषयी दुष्मनी विसरून जा. आरक्षणाचा भुलभूईय्या संपणार आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काही वाद नाही. मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो, आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका. तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो”, असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
‘बच्चन, शाहरुख मुंबई सोडून जाणार होते’
“राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता. फक्त मी आणि शरद पवार होतो. जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो. अमिताभ बच्चन, शाहरुख खान मुंबई सोडून जाणार होते. मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली. दाऊदचं नाव घ्यायला लोकं घाबरायचे. आपण लढायचं असतं घाबरून जायचं नसतं”, असं छगन भुजबळ म्हणाले.
‘मी काही लहान बाळ आहे का?’
“माझा आवाज वाढलेलाच असतो. आमदारांचे घरं पेटवले तेव्हा माझी लढाई सुरू झाली. मग मी राजीनामा दिला होता. पोलीस हतबल झाले होते म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला. होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजित दादांनी बोलावून घेतलं आणि मला लोकसभा लढायचं सांगितलं. जेव्हा मी म्हंटल लोकसभा लढणार नाही मग त्यावेळी अजित दादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होत ना? मी काय दूध पितो का? मी काही लहान बाळ आहे का? मला समजत नाही का?”, असे सवाल छगन भुजबळ यांनी केले.
‘मी काही मूर्ख आहे का?’
“साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती. अजित दादांनी शब्द दिला म्हणजे काय? काही चर्चा आहेत की नाही? शरद पवार सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे. आठ दिवसांपूर्वीच समीर भाऊंना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू. मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं. मी काही मूर्ख आहे का?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
भुजबळांचा अजित पवारांना खोचक टोला
“इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळचा बळी घेणार का? मी 2 वर्षांनी जाणार असं बोललो. मी काही लल्लू-पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली की कोण मंत्री होणार. माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे? तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा. लढा मंत्रिपदाचा नाही. लढा अपमानाचा आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वैगेरे मानत नाही. ही लोकशाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आग्रह केला होता की काहीही करून भुजबळांना मंत्री करा. पण ऐकलं नाही. कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार, जास्त शहाणे”, असा टोला छगन भुजबळ यांनी अजित पवारांना लगावला.
“प्रश्न मंत्रीपदाचा अजिबात नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पण वादा आहे ना? मी कुठेही जाणार नाही. उद्या मी सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहे मग बघू. निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका. जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू. सोशल मीडियावर अजिबात काही चुकीचं टाकू नका. अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका. कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात”, असं छगन भुजबळ म्हणाले.