कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी एका धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. स्लॅब कोसळल्यानंतर (Building Collapse) ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले. इमारत कोसळल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी बचावकार्य सुरु केले. या बचावकार्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वरच्या मजल्यावर अडकलेली एक 14 वर्षांची मुलगी रडताना दिसत आहे. या दुर्घटनेत ही मुलगी थोडक्यात बचावली पण तिच्या आईचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी आले तेव्हा ही मुलगी खिडकीत उभी होती. ती बाहेरच्या लोकांना रडत रडत ‘मम्मी गेली… मम्मी गेली’, असे सांगत आहे.
सप्तशृंगी इमारत ही चार मजली होती. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोबा तयार करण्याचे काम सुरु होते. मंगळवारी दुपारी इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि थेट तळमजल्यापर्यंत येऊन आदळला. त्यामुळे चौथा, तिसरा, दुसरा मजला, पहिला मजला आणि तळ मजल्यावरील घरांमध्ये राहणारे लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. खिडकीची ग्रील पकडून राहिल्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील मुलगी थोडक्यात वाचली. मात्र, तिच्या आईचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानाने शिडी लावून या मुलीला सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र, तिचा आक्रोश पाहून अनेकांचे काळीज अक्षरश: हेलावले.
कल्याण पूर्वेतील चिकणी परिसरातील सप्तशृंगी को.ऑप. हौ. सो या जुन्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरिल फ्लॅटमध्ये राहणारे कृष्णा लालचंद चौरसिया हे विनापरवानगी त्यांचे फ्लॅट मध्ये टाईल्स चे काम करत असल्याने एकूण चार स्लॅब पडून घडलेल्या घटनेत एकूण सहाजण मयत झाले. तर चारजण जखमी झाले आहेत. या घटनेच्या अनुषंगाने केडीएमसीचे J वॉर्ड अधिकारी सचिन तामखडे यांच्या यांच्या तक्रारीवरून इमारतीमधील घरमालक कृष्णा लालचंद चौरसिया यांच्याविरुद्ध कल्याण कोळशेवाडी पोलिस स्टेशन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा चौरसिया या घरमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणे मयत इमारत दुर्घटनेतील मृतांचे बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.
Building Collapse: कल्याण इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे
प्रमिला साहू (वय 58)
नामस्वी शेलार (वय दीड वर्षे)
सुनीता साहू (वय 37)
सुजाता पाडी (वय 32)
सुशीला गुजर (वय 78)
व्यंकट चव्हाण (वय 42)