मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद राहणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सर्व दुकानं आणि आस्थापना बंद ठेवण्यात आली आहेत. मस्साजोग गावचे सर्व नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत.
संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, ठरवलं तर पाच मिनिटात वाल्मिक कराडला पकडून आणता येईल, पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड मोकाट आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपतीनी केला आहे. तसेच धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
मोर्च्यात कोण कोण सहभागी होणार?
खा.बजरंग सोनवणे,
आ.संदीप क्षीरसागर,
आ प्रकाश सोळंके,
आ.सुरेश धस,
आ. जितेंद्र आव्हाड,
अंजली दमानिया,
मनोज जरांगे पाटील,
छत्रपती संभाजी राजे भोसले
अंजली दमानिया यांचा धक्कादायक दावा-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी सांगितलंय. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.
कोण आहेत वाल्मीक कराड?
वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मीक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे.