राज्याची क्राईम कॅपिटल अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही. 24 तासात शहर आणि ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची निर्घृण हत्या झाली आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पहिली घटना गोरेवाडा जंगल परिसरात घडली आहे. अमन गजेंद्र ध्रुववंशी (20, रा. मानकापूर) या कॉलेज तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली. या घटनेत आरोपींनी अमन ध्रुववंशी या तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले आणि गोरेवाडा जंगल परिसरात त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री घडली असून रविवारी दुपारी एका आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चौघांना ताब्यात घेतले आहे.
खापा येथील गांधी चौकात चेतन अशोक गागटे (31, रा. हनुमान घाट) याच्यावर रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भरदिवसा सिनेस्टाईल पाठलाग करत गोळीबार केला. त्याच्यावर आरोपी अर्जुन निळे याने तीन गोळ्या झाडल्या. त्यात चेतनचा मृत्यू झाला. गोळीबार नंतर आरोपी अर्जुनने स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. मात्र या हत्येमागचा नेमका उद्देश मात्र अद्याप समोर आला नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नागपुरातील कुही तालुक्यातील पाचगाव भागात एक हत्येची घटना घडली. चौकीदाराची नोकरी करणाऱ्या सुमंतलाल मरस्कोल्हे याचा हातपाय बांधून निर्घृण खून करण्यात आला. कळमना-उमरेड मार्गावरील एका बांधकाम स्थळावर हत्येची ही घटना घडली. त्या ठिकाणी कामावर असलेल्या तीन मजुरांनीच हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.