मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमधून (Bhind) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून कात्री (Scissors) काढण्यात आली आहे. 2 वर्षांपूर्वी ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयात महिलेचे ऑपरेशन झाले होते. यावेळी डॉक्टरांकडून त्याच्या पोटात कात्री राहिली. भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन केल्यानंतर महिलेच्या पोटात कात्री दिसल्याने डॉक्टरांसह रुग्णाच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन प्रभारी सतीश शर्मा यांना महिलेचा सीटी स्कॅन करत असताना ही बाब उघडकीस आली. कमला असं या पीडित महिलेचं नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून महिलेच्या पोटात कात्री राहिली. गोरमीच्या सोंडा गावात राहणाऱ्या 40 वर्षीय कमलादेवी यांना गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. पती कमलेश पत्नीसह ग्वाल्हेरच्या कमलराजा रुग्णालयात गेला होता. जिथे 22 फेब्रुवारी 2023 रोजी डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु, ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकून पोटात कात्री राहिली.
शस्त्रक्रियेनंतर पीडित महिलेलाही ही बाब लक्षात आली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलेच्या पोटात दुखत होते आणि औषधोपचार करूनही वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅनमध्ये महिलेच्या पोटात कात्री स्पष्टपणे दिसत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.
डॉक्टरांच्या चुकीमुळे पत्नीला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या आणि तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही पीडित महिलेच्या पतीने केला आहे. कमलेश यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे. सिटी स्कॅननंतर डॉक्टरांनी पीडित महिलेला ग्वाल्हेरला रेफर केले.