जॉर्जियातील गुदौरी स्की रिसॉर्ट नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये 12 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये 11 परदेशी आणि एका जॉर्जियन नागरिकाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या रेस्टॉरंटमध्ये कर्मचारी झोपायचे त्या खोलीत मृतांचे मृतदेह सापडले आहेत. अधिकृत अहवालानुसार, मृतांमध्ये रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृतांच्या शरीरावर कोणत्याही दुखापतीच्या खुणा नाहीत, यावरून त्यांचा मृत्यू अपघातात झाल्याचे दिसून येते. प्राथमिक तपासात लाईट नसल्याने बंद खोलीतील जनरेटरचा वापर हे मृत्यूचे कारण सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आलेल्या लोकांना बेडशेजारी ठेवलेला जनरेटर चालू असल्याचे दिसले.
अजूनही या प्रकारणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा करून तपासासाठी पाठवले. पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेच्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत, फॉरेन्सिक वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केला जात आहे आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठीही तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात लहान खोलीत जनरेटर वापरल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड पसरल्यामुळे श्वसनात अडथळा निर्माण झाले व इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना प्राण गमवावे लागल्याचे दिसून आले असले तरी, मृत्यूचे ठोस कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघातामुळे रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा आपत्तींपासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या सुरक्षेच्या खबरदारी, विशेषतः बंद ठिकाणी जनरेटरचा वापर करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य उघड करण्याचे आश्वासन दिले आहे. मृतांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.