परभणी (Parbhani) मध्ये तिसर्यांदा मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल ओतून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंडलिक उत्तम काळे असे या आरोपीचे नाव आहे. कुंडलिक 32 वर्षाचा आहे. ही घटना गुरूवार 26 डिसेंबरची आहे. याबाबत मृत मैना च्या बहीणीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
मैनाच्या बहिणीच्या तक्रारीमध्ये दिल्यानुसार, कुंडलिक आपल्या पत्नीला तिन्ही मुली झाल्या म्हणून सतत टोमणे मारत होता. यावरून वाद होत होते. गुरूवार 26 डिसेंबर दिवशी अशाच एका भांडाणानंतर त्याने मैनाच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि तिला पेटवून दिलं. जळत्या अवस्थेमध्ये ती घराबाहेर पडली. लोकं आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मैनाला गंभीर जखमा झाल्या होत्या यामध्ये तिला हॉस्पिटल मध्ये नेण्याआधीच मृत्यूने गाठलं होतं.गंगाखेड पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी काळे ला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खूनाचा आरोप लावण्यात आला आहे.
परभणी मधील ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. या कृत्यामधील क्रूरपणा अकल्पनीय आहे. या संवेदनाहीन हिंसेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज 21 व्या शतकातही पुरोगामी महाराष्ट्रात मुलगा वंशाचा दिवा म्हणून बघितला जात आहे आणि त्यासाठी अनेक महिलांवर दबाव आणला जातो. त्यांना शारिरीक, मानसिक त्रास दिला जात आहे.