धक्कादायक! गोंदिया शिवशाही बस चालकाकडून यापूर्वी 7 वेळा अपघात

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भंडारा इथून गोंदियाकडं प्रवासी घेऊन निघालेल्या शिवशाही बसला (Gondia Shivshahi Bus Accident) गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ 29 नोव्हेंबरला भीषण अपघात घडला होता. या अपघातात 11 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारला घडली होती. या प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी शिवशाही बस चालक प्रणय रायपुरकर याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांनी चालक प्रणय रायपूरकर याच्या निलंबनाचा आदेश काल रात्री काढला असून सध्या चालक प्रणय रायपूरकर हा डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक राहणार आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रणय रायपूरकर याच्या हातानं यापूर्वी सात किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा कमी नुकसानीचे हे सात अपघात घडल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली.

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत-
दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत. सध्या मृतांचा आकडा 11 वर असला तरी अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू
सदर अपघातामध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेली स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासू सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जीवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. आपले परिवारांना भेटून स्मिता आज 29 नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला गेल्या आणि गोंदियाला जाण्यासाठी याच बसने जात असता हा अपघात घडल्याने स्मिताचा जागीच मृत्यू झाला.

शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे –
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर

टीप : मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *