पाकिस्तानमधील एका ऑनर किलिंगच्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनैतिक संबध असल्याच्या आरोपातून एका जोडप्याची भरदिवसा हत्या केली जात असल्याचे दिसून येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ बलुचिस्तानमधील आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक जोडप्याला वाहनातून खाली उतरवून वाळवंटी भागात घेऊन जाताना दिसत आहेत आणि त्यानंतर या दोघांना एक व्यक्ती अगदी जवळून गोळ्या घालून ठार करताना दिसत आहे.
नेमकं काय झालं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शालीने डोके झाकलेली एक महिला एका व्यक्तीच्या पुढे चालताना दिसत आहे आणि हे सर्व होत असताना लोकांची गर्दी उभं राहून पाहत असल्याचे दिसत आहे. महिला काही अंतर चालून गेल्यानंतर तो व्यक्ती पाठीमागून तिला गोळ्या घालतो. यादरम्यान ब्राहवी या स्थानिक भाषेत बोलताना ती महिला म्हणते की, “तुम्हाला फक्त माझ्यावर गोळ्या झाडण्याची परवानगी आहे, दुसर्या कशाची नाही.” यानंतर तिला एकापाठोपाठ एक अनेक गोळ्या घातल्या गेल्या. तीन गोळ्या लागल्यानंतर ती जमिनीवर कोसळली आणि त्यानंतरही गोळीबाराचे आवाज ऐकायला येतात.
११ जणांना अटक
ही घटना ईद अल-अजहाच्या तीन दिवस आधी घडल्याचे सांगितले जात आहे, ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानातून संताप व्यक्त केला जात आहे. सिव्हील सोसायटी ग्रुप्स, धार्मिक नेते आणि राजकीय नेत्यांनी देखील या हत्येचा निषेध केला आहे, तसेच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफाराज बुगती यांनी सोमवारी या गुन्ह्यात सहभागी ११ लोकांना अटक केल्याची माहिती दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्वेट्टाच्या हन्ना-उराक पोलीस ठाण्यात स्टेशन हाऊस ऑफिसर नावीद अख्तर यांनी एफआयआर नोंदवला आहे. तसेच पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे चेअरमन बिलावल भुट्टोझरदारी यांनी या कृ्त्याचा निषेध केला आहे.