हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणे दोन भावांना महागात पडले. त्यानंतर झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावच्या इस्टूल वाडीमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री खोपोली जवळील बीड गावच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभा निमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार हे दोघे मद्यधुंद होऊन नाचत होते. त्यांनी नाचताना शर्ट काढून नाचण्याचा ठेका धरला. यावरून त्यांच्याच आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले. येथे मुली महिला नाचत आहेत, त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असं सांगण्याचा प्रयत्न केला.
याच गोष्टीचा राग मनात धरून बाळू मुकणे आणि प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मधे पडला. तेव्हा प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता उचलला आणि विलास वाघमारे याच्या डोक्यात घातला.
या मारहाणीत विलास रक्तबंबाळ होऊन मृत्युमुखी पडला. तर भांडण मिटवायला गेलेल्या विलासच्या भावाला देखील जबर मारहाण झाल्याने तो सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.
एक आरोपी फरार
सदर घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी तेथून पसार झाले होते. पण त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले. दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा फरार असून त्याचा शोध खोपोली पोलीस घेत आहेत.