मोठी बातमी समोर येत आहे, धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार धक्का लागण्याच्या कारणातून वाद झाला, या वादानंतर या तरुणानं धावत्या लोकलमध्ये तीन जणांवर चाकू हल्ला केला आहे. शेख जिया हुसेन असं या हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही ट्रेन कल्याणहून दादरला निघालेली होती. कामावर जाण्याची घाई असल्यानं या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जो हल्लेखोर तरुण आहे शेख जिया हुसेन याला मुब्राला उतरायचं होतं. मात्र त्याला उतरायला जागा मिळत नव्हती. त्याला जेव्हा माहिती पडलं की ही फास्ट ट्रेन मुब्रा येथे थांबणार नाही तेव्हा तो लोकांना धक्का मारून, दरवाजाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न करत होता. यावरून वाद सुरू झाला, काही प्रवाशांनी त्याच्यासोबत वाद घातला.
त्याला दरवाजाकडे जायचं होतं, मात्र त्याला जागा मिळत नव्हती, त्यानंतर त्याने त्याच्यासमोर असलेल्या प्रवाशांना धक्का मारून दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी लोकलमधील काही प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला. त्याला राग आल्यानं त्याने आपल्या खिशातील चाकू काढून त्याने तीन जणांवर चाकूचा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रवाशी जखमी झाले आहेत.
तरुणाला अटक
या धक्कादायक घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी हल्लेखोर तरुण शेख जिया हुसेन वय 19 वर्ष या तरुणाला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकमधल्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.