कल्याण मधून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील एका 13 वर्षीय मुलाने रविवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या केली. मृत मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने शिक्षक आणि वर्गमित्रांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीत शिकणारा हा मुलगा संध्याकाळी 7:15 वाजता त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या या निर्णयासाठी त्याच्या कला शिक्षक आणि वर्गमित्रांकडून मानसिक दबाव आणि छळ केल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्या केलेला विद्यार्थी हा कल्याण पूर्वेतील आयडियल स्कूलचा विद्यार्थी होता. मात्र, मृत मुलाने सुसाईड नोटमध्ये त्याच्या शाळेचे नाव लिहिलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. शाळेचे अधिकारी विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या शिक्षकांची आणि वर्गमित्रांची चौकशी करत आहेत.
दरम्यान, गेल्या महिन्यात टिटवाळा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं. या विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये शाळा चालकाकडून शारीरिक शोषण आणि धमकावल्याचा आरोप केला होता.