गोव्यात रविवारी मॅरेथॉन (Marathon) मध्ये भाग घेतल्यानंतर काही वेळातच एका 39 वर्षीय दंतचिकित्सकाचा (Dental Surgeon) मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दंतचिकित्सकाचे नाव डॉ. मिथुन कुडाळकर असे असून ते बोगमलो येथील रहिवासी आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, दक्षिण गोव्यातील चिकालीम गावात झुआरी नदीच्या काठावर दरवर्षी आयोजित 20 मैल (32.2 किमी) श्रेणी मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला होता.
डॉ. कुडाळकर यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, ते स्वतःचे एक उत्साही हाफ मॅरेथॉन धावपटू, सायकलस्वार आणि क्लब बॅडमिंटनपटू म्हणून वर्णन करतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून त्यासोबतच त्यांनी सायकलिंग आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता.
त्यांचे वडील डॉ. ज्ञानेश्वर कुडाळकर, जे मुरगाव पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत, यांच्या मते, डॉ. कुडाळकर अत्यंत तंदुरुस्त होते आणि त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींचा समावेश केला होता. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांत त्याने अनेक रनिंग आणि सायकलिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला आहे आणि पदकेही जिंकली आहेत.’
डॉ. ज्ञानेश्वर कुडाळकर यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मुलगा घरी येताच त्याने त्याच्या खांद्यावर आणि पोटात काही समस्या असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी त्याला थोड्यावेळ आराम करण्यास सांगितले. त्याला उलट्या झाल्या. त्यानंतर तो थोडे पाणी प्यायला आणि मग बेडवर पडला. आमच्या कुटुंबात सर्व डॉक्टर आहेत… त्यामुळे आम्ही सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पण तो प्रतिसाद देत नव्हता. काही वेळातच आम्ही त्याला चिकलीम येथील रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
आपल्या मुलाचा मृत्यू ‘मॅसिव्ह हार्ट अटॅक’मुळे झाल्याचा डॉ. ज्ञानेश्वर कुडाळकर यांनान संशय आहे. गोवा बॅडमिंटन असोसिएशनने एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की ते प्रखर फिटनेस प्रेमी होते. असोसिएशनने सांगितले की, ‘त्यांना बॅडमिंटन, सायकलिंग आणि रनिंगची आवड होती. त्यांनी बॅडमिंटन स्पर्धा आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि अनेकांना त्याच्या फिटनेससाठी उत्साहाने प्रेरित केले.