लेखणी बुलंद टीम:
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत या योजनेचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे महिलांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा दावा केलाय. “शिंदे सरकार निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करणार”, असा मोठा दावा अनिल देशमुख यांनी केला.
“लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आदिवासींच्या बजेटमधील पैसे कमी केले. नगरपालिका महानगरपालिकेच्या विकास निधी वळती केले. हे सर्व पैसे राज्य सरकारने उडविले आहे. याची माहिती नगरपालिकेच्या सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे. निवडणूक होईपर्यंत ही योजना सुरू राहील. निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिणी योजना बंद करण्यात येईल”, असा दावा अनिल देशमुख यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर केला.
‘महाराष्ट्रात 50 कोटीत आमदार खरेदी केलेत, कर्नाटकात तीच किंमत 100 कोटींवर’
“आमदारांना फोडण्यासाठी भाजप सरकारने 50 – 50 कोटी रुपये दिले. मागील अडीच वर्षांपासून राज्यांमध्ये तेच राजकारण सुरू आहे. काही पक्ष फोडलेत. ईडी, सीबीआयचा धाक दिल्याने आमचे काही नेते पळालेत. महागाई वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. एका एका आमदाराला 50 – 50 कोटी रुपये दिले. 45 आमदारांचा हिशोब लावा. महाराष्ट्रात 50 कोटींचा भाव होता. तर कर्नाटकात तर हा भाव 100 कोटींवर पोहोचलेला आहे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्टाने कधीही पाहिलेला नाही”, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली.