लेखणी बुलंद टीम:
राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांनी पुण्यात मूक आंदोलन केले. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली.राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांनी पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन केले. यावेळी सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनावेळी शरद पवारांनी तोंडावर काळ्या रंगाचा मास्क आणि दंडावर काळी पट्टी बांधत सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर शरद पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली.
शरद पवार यांनी दिलेली शपथ
“मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवेन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखेन आणि या पुण्य नगरीतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन”, अशी शपथ शरद पवारांनी यावेळी वाचून दाखवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही ही प्रतिज्ञा घेतली.
राज ठाकरेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी घेतलेल्या या शपथेवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “तुमच्या हातात सरकार येतं, तेव्हा तुम्ही या गोष्टी करा. नुसत्या शपथा कसल्या घेताय?” अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल चढवला.