सांगलीमधील राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुरेश पाटील (Suresh Patil) यांना तातडीने येथील उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सुरेश पाटील यांनी हे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सुरेश पाटील यांनी त्याच्या निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
सुरेश पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र, सुरेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या तीन दशकांपासून सांगली जिल्ह्यातील राजकारण, व्यापार, शिक्षणक्षेत्र आणि समाजकारणात सुरेश पाटील यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येताच सांगलीकरांना मोठा धक्का बसला.
सुरेश पाटील हे गेल्या वर्षभरापासून काही कारणास्तव राजकारण आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला गेल्या रविवारी ते उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी नेमीनाथनगर येथील घरी साडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही गोष्ट वेळीच कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आता सुरेश पाटील यांनी प्रकृती स्थिर आहे.
‘तो’ फोन आल्यानंतर बाबासाहेब मनोहरेंनी गोळी झाडून घेतल्याचा दावा
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री बाबासाहेब मनोहरे यांना एक फोन आला होता. या फोनवर बोलल्यानंतर बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या खोलीत जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे हा फोन नक्की कोणाचा होता, याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.