कर्नाटक पोलिसाचे निवृत्त महासंचालक ओम प्रकाश (वय 68) यांची हत्या करण्यात आली आहे. बंगळुरुतील त्यांच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे प्रेत आढळले. ओम प्रकाश यांची हत्या ही कौटुंबिक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेमुळे कर्नाटकच्या पोलिस दलात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
ओम प्रकाश हे 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी असून 2015 ते 2017 या काळात कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक होते. पल्लवी असं त्यांच्या पत्नीचं नाव असून तिनेच ओम प्रकाश यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.
निवृत्त झाल्यानंतर ओम प्रकाश हे बंगळुरुमध्येच राहायला होते. त्यांच्या पत्नीसोबत त्यांचा वाद सुरू होता. त्यांची पत्नी मानसिक रुग्ण असल्याचीही माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळी ओम प्रकाश हे त्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती ओम प्रकाश यांच्या पत्नीनेच पोलिसांना दिली.
ओम प्रकाश हे मूळचे बिहारमधील चंपारण्यमधील असून जीओलॉजीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर ते कर्नाटक पोलिसच्या सेवेमध्ये रुजू झाले.