उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) मध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले आहे. फतेहपूर जिल्ह्यात NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, तिला तिच्या दोन शिक्षकांनी सहा महिन्यांच्या कालावधीत ओलीस ठेवले होते आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. विद्यार्थिनीने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, एका शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर शिक्षकाने तिचे पुढचे अनेक महिने शोषण केले. त्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या पीडितेने आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त (कानपूर) अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की, विद्यार्थिनीने शुक्रवारी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात आला. जीवशास्त्र शिकवणारे साहिल सिद्दीकी आणि रसायनशास्त्र शिकवणारे विकास पोरवाल या दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि POCSO कायद्याच्या तरतुदीनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, पीडितेवर बलात्कार करण्यात आला तेव्हा तिचे वय 17 वर्षे होते. पीडितेने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, जानेवारी 2023 मध्ये सिद्दिकीने तिला कानपूरमधील मक्की-खेडा भागातील त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर नवीन वर्षाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले. यावेळी सिद्दिकीने पीडितेला येथे इतर विद्यार्थीही येत असल्याचे सांगितले. परंतु, जेव्हा ती फ्लॅटवर पोहोचली तेव्हा फक्त सिद्दीकी तिथे होता. ज्याने तिच्या शीतपेयात काहीतरी मिसळून तिच्यावर बलात्कार केला आणि या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले.
तक्रारीनुसार, सिद्दीकीने तिला आपल्या फ्लॅटमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ओलीस ठेवले होते, यादरम्यान त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि याविषयी कोणाला सांगितल्यास व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्याची धमकी दिली. काही महिन्यांनंतर पोरवाल याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. तिने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ती पोलिसांची मदत घेण्याचे धैर्य दाखवू शकत नव्हती, कारण तिला भीती होती की यामुळे तिचे कुटुंब धोक्यात येईल.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (कानपूर) अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी शिक्षकांवर पॉक्सो कायदा आणि इतर बीएनएस कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात 328 (कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूने विष प्राशन करून इजा करणे), 376 ( 2) (n) (त्याच महिलेवर वारंवार बलात्कार), 344 (10 किंवा अधिक दिवसांसाठी चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.