गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यांसह किमान तापमान वाढलं आहे. मात्र, दिवसभर हवेत गारवा जाणवत आहे, त्यामुळे थंडी जाणवत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या तीन दिवसांत पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, उत्तर भारतातून शीत लहरी येत असल्यामुळे थंडी आणि पाऊस असे वातावरण राहणार आहे.
हवामान विभागाने राज्यात 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर 26 ते 28 डिसेंबरच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवस शहरात थंडी आणि पाऊस असे वातावरण राहील, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतची सर्व राज्ये गारठली असून, त्या भागांतून शीत लहरी राज्यात येत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांना 26 ते 28 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात थंडी आणि पाऊस असे मिश्र वातावरण राहील, असा अंदाज आहे.
पुढील चार दिवस ‘या’ 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अमरावती, बुलढाणा, गोंदिया नागपूर, वर्धा, वाशिम
गारपीट होण्याचीही शक्यता
भारताच्या पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पश्चिमी झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
26 डिसेंबर
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर
27 डिसेंबर
धुळे ,नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला,अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम
28 डिसेंबर
जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती गोंदिया, नागपूर