राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवा राजकीय घटनांना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज आदित्य ठाकरे आले असता भाजप आणि शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करून काही जणांना ताब्यातही घेतले आहे.
भाजप- शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजी नगर मध्ये आदित्य ठाकरे आले असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. या विरोधाला प्रतिउत्तर देत शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजीने वातावरण अधिकच तापले व दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. या घटनेत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.
अंबादास दानवेंनी भाजपच्या कृतीचा केला निषेध
छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या राड्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी येऊन भाजपच्या कृतीचा निषेध केला. खाली बसून त्यांनी ठिय्या धरला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना हलवल्याचे समजते. ते म्हणाले, “काल या संदर्भात सिपिंना फोन केला होता पण त्यांनी लक्ष दिल नाही या घटनेला पोलीस जबाबदार आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्याला ठाकरे गटाने विरोध केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. या राड्यात दोन्ही गट एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि जोरदार घोषणाबाजी केली. या घडामोडींमुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या संघर्षामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून छत्रपती संभाजी नगरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.