देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी (Mehul choksi) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएनबी बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या अपीलवरून 65 वर्षीय चोक्सीला शनिवारी (12 एप्रिल 2025) अटक करण्यात आलीय आणि तो अजूनही तुरुंगात असल्याची माहिती पुढे आली आहे. मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून 13, 500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता. मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाच्या वॉरंटचा दिला हवाला
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासहसह देशातून पसार झाले होते. तपासयंत्रणेनं सन 2018च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला (Mehul choksi) फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं आहे. अशातच आता मेहुल चोक्सीला अटक करताना, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला असल्याची माहिती पुढे आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, हे वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आले होते. शिवाय पुढे असे म्हटले जात आहे की, मेहुल चोक्सी प्रकृती बिघडली असल्याने आणि इतर कारणांमुळे जामीनसह तात्काळ सुटकाही मागू शकणार असल्याची शक्यता आहे.
चोक्सीवर पीएनबीकडून 13,850 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
पीएनबीला 13,850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली सीबीआय आणि ईडीने मेहुल चोक्सीवर खटला चालवत आहेत. चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा देखील या प्रकरणात आरोपी आहे, जो लंडनमध्ये लपून बसला आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणाचीही प्रतीक्षा आहे. दरम्यान, बँकांना लुटून मेहुल चोक्सीने परदेशात पळ देखील काढला होता. त्यानंतर चोक्सीशी संबंधित असणाऱ्या 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात येत होती. मेहुल चोक्सीची ज्या बँकांची फसवणूक केली त्या बँकांना मालमत्ता परत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. सोबतच मेहूल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिलेली आहे