पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा PSI महिलेकडून एन्काऊंटर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर (Hubli Encounter) केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे हुबळी शहरात प्रक्षोभ निर्माण झाला होता. पाच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजयनगर पोलिस स्थानकात दाखल झाली होती. सीसीटीव्ही आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार (वय 35) याला अटक केली होती. त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी घटनास्थळी घेऊन गेले होते. तेथे रितेश कुमार याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी फौजदार अन्नपूर्णा यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडली. पण तरीही रितेश कुमार पळून जात होता. त्यामुळे फौजदार अन्नपूर्णा यांनी त्याच्या पायावर आणि पाठीवर गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या रितेश कुमार याला उपचारासाठी किम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेत एक पीएसआय आणि दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आश्वासन देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार (Rape News) केला. नंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर नराधमाने तिचा मृतदेह एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून दिला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर हुबळीत प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. अशोक नगर पोलीस ठाण्याबाहेर हजारो संतप्त नागरिकांचा जमाव जमला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानंतर रितेश कुमारला ताब्यात घेण्यात आले होते. रितेश कुमार हा बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. तो हुबळीत कामासाठी वास्तव्याला होता. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार याला शोधून काढले.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी विजयनगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीची आई घरकाम करायची. घरकामासाठी जाताना आई तिच्या मुलीला सोबत घेऊन जायची. आई एका घरी काम करत असताना रितेश कुमारने मुलीचे अपहरण केले होते. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला तेव्हा पत्र्याच्या एका शेडमधील बाथरुममध्ये मुलीचा मृतदेह सापडला होता.

याप्रकरणी आम्ही रितेश कुमार या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्याने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यावेळी पीएसआय अन्नपूर्णा यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात रितेश कुमार मारला गेला. रितेश कुमार याच्या छाती आणि पायावर गोळी लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *