लेखणी बुलंद टीम:
ही गोष्ट एखादा चित्रपटाला साजेशी वाटते. मात्र चिकाटी व जिद्दीला गुरूंची साथ मिळाली तर यशाच्या शिखरावर पोहोचता येते, असाच अनुभव २९ वर्षीय आकाश कापुरे याला आला आहे. नंदुरबार पोलीस भरतीत त्याची निवड झाल्याने येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला.
घरची परिस्थिती बेताची. वडील अपघातानंतर दहा वर्षांपासून अंथरुणात खिळून. आई मोलमजुरी करून घराचा चरितार्थ चालवते. पैशांअभावी शिक्षण सोडावे लागले. मिळेल ते काम करताना उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा वर्ष विविध कामं केली. नंदुरबार येथील नाट्य मंदिरात लग्नांमध्ये वेटरचं कामही केलं. अखेर यश प्राप्त झाल्यावर त्याच नाट्य मंदिरात हजारो लोकांसमोर सत्कार स्वीकारला. आकाशने सांगितेलाल अनुभव ऐकून अनेकांचे डोळे पाणावले
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे राहणाऱ्या आकाश कापुरे याच्या कुटुंबात आई-वडील व चार भावंडे. त्याची घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. वडील किशोर तोताराम कापुरे हे गवंडी काम करत असताना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे दहा वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून आहेत. आई सुनंदा कापुरे या दोंडाईचा येथे मिरची कांडप केंद्रात मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र मुलांनी शिकावं व स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी त्या कायमच मुलांना प्रेरणा देत होत्या.
२०१२ मध्ये आकाशचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्याने दोंडाईचा येथील एका कॉलेजमध्ये सिव्हिल डिप्लोमाला प्रवेश घेतला. मात्र त्या ठिकाणी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी पैसे नसल्याने त्याला शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. २०१४ मध्ये तो पहिल्यांदा पोलीस भरतीत सहभागी झाला होता. मात्र त्यानंतर दहा वर्षांच्या प्रयत्नांनी त्याला यश आलं आणि २०२४ मध्ये नंदुरबार येथे झालेल्या पोलीस भरतीत त्याची निवड झाली.