राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळी म्हटली की फटाके आलेच! मात्र फटाक्यांच्या साथीने सणासुदीचा आनंद द्विगुणित करताना खबरदारी बाळगणे तितकेच महत्त्वाचे ठरते. प्रामुख्याने फटाके उडवताना होणाऱ्या इजांपासून सावध राहावे, असं आवाहन नेहमी केलं जातं.
तुमच्या उत्सवी वातावरणाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून फटक्यांनी होणाऱ्या इजा कशा हाताळायच्या आणि सुरक्षित दिवाळी साजरी करायची याबाबत नाशिकच्या डॉ. अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटलच्या सल्लागार नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी पिंपरीकर यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे. फटाक्यामुळे होणारे नुकसान हे अल्प स्वरुपाचे किंवा अत्यंत गंभीर असू शकते. प्रामुख्याने डोळ्यांसंबंधी झालेली इजा कायमस्वरुपी अंधत्वाला जबाबदार ठरू शकते. तुम्हाला स्वत:ला किंवा जवळच्या कोणाला अशास्वरुपाची इजा झाल्यास याबाबत काय-काय करावे, याबाबत डॉ. शुभांगी पिंपरीकर यांनी काही मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत.
फटाके उडवताना इजा/जखमा झाल्यास करावयाची कृती:
दृष्टी तपासणे: ज्याला इजा झालेली नाही तो डोळा बंद करा आणि दुखापतग्रस्त डोळ्याने दिसते आहे का किंवा दृष्टी धूसर झाली का याची चाचपणी करा.
नेत्रतज्ज्ञांचं साह्य घ्या: दृष्टी अधू झाल्यासारखे वाटल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञ (ऑप्थल्मोलॉजिस्ट)चा सल्ला घ्या. घरगुती उपचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
खाजवू नका: डोळ्याला स्पर्श करू नका किंवा खाजवू नका.
काही टोचत असल्यास काढण्याचा प्रयत्न करू नका. डोळ्यात खुपल्यासारखं वाटत असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका.
रक्तस्राव नियंत्रित ठेवा. रक्तस्राव होत असल्यास स्वच्छ रुमाल/ सुती कापडाने डोळा झाकून घ्या.
ताण येऊ देऊ नका. इजा झालेल्या डोळ्यावर कोणत्याही स्वरुपाचा ताण येणार नाही याची खातरजमा करा.
फटाक्यांचा वापर सुरक्षित पद्धतीने कसा करावा?
सुरक्षित आणि आनंददायी दिवाळी सुनिश्चित करण्यासाठी फटाके जबाबदारीने हाताळणे महत्त्वाचे आहे. येथे काही सुरक्षा टिपा देण्यात आल्या आहेतः
हुशारीने खरेदी कराः सरकारी नियमांचे पालन करणाऱ्या परवानाधारक दुकानांमधूनच फटाके खरेदी करा.
मुलांवर देखरेख ठेवाः मुलांना कधीही एकट्याने फटाके फोडण्याची परवानगी देऊ नका. उत्सवांच्या वेळी नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा.
सुरक्षित ठिकाणांची निवड करा: ज्वलनशील वस्तू आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर खुल्या भागात फटाके फोडणे.
एका वेळी एकः अपघात टाळण्यासाठी एका वेळी फक्त एक फटाका पेटवा.
योग्य पोशाख कराः नैसर्गिक कपड्यांपासून बनवलेले सुती कपडे वापरा. कारण त्यांना आग लागण्याची शक्यता कमी असते. या पद्धतीने खबरदारी घेतल्यास, तुमची दिवाळी सुखा-समाधानात आणि सुरक्षित साजरी होईल. एखादप्रसंगी इजा झाल्यास, नजीकच्या नेत्र रुग्णालयात तातडीने वैद्यकीय मदत घेण्यास विसरू नका. सण जबाबदारीने साजरा करा आणि उत्सवी पर्वाची मजा लुटा.