महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने मारली बाजी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. अंतिम सामन्यात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि सामना जिंकला. महेंद्र गायकवाड याने निकालावर आक्षेप घेत मैदान सोडले. पंचांसोबत हमरीतुमरी झाल्यानंतर महेंद्र गायकवाड उघडा होऊन मैदानाबाहेर गेला. पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.

पाच मिनिटे रंगलेल्या या कुस्तीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने टाकलेले डाव यशस्वी ठरले. या डावात महेंद्र गायकवाड फसला आणि त्याने मैदान सोडलं. इतकंच काय तर पंचांच्या निर्णयावरही आक्षेप घेतले. दुसरीकडे, पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि त्याला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली. पृथ्वीराज मोहोळ याने विजयानंतर आनंद व्यक्त केला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन पृथ्वीराज मोहोळचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. दुसरीकडे, शिवराज राक्षेवर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या असेल, अशी भूमिका पंचांनी घेतली होती. पण मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *