पीएम मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पीएम मोदी 26 सप्टेंबर रोजी पुण्यात नवीन भूमिगत मेट्रो रेल्वेचे (Pune Metro) उद्घाटन करतील आणि उन्नत मार्गाची पायाभरणी करतील.
पुण्यातील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे विस्तारीकरण आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा उन्नत मार्ग उभारण्याचे भूमिपूजनही ते करणार आहेत. फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोसाठी आम्ही नवीन टप्पे बांधत आहोत. गणपती उत्सवात मूर्ती विसर्जनासाठी 3.5 लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला.
पीसीएमसी-स्वारगेट पुणे मेट्रो कॉरिडॉर 17.4 किलोमीटर लांबीचा असून त्यात 14 स्थानके समाविष्ट आहेत. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग 26 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. शासनाने या मार्गाला दोन विस्तार जोडण्याची योजना आखली आहे, एक पीसीएमसी ते निगडी आणि दुसरा स्वारगेट ते कात्रज. दरम्यान याआधी 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या 12 किमी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.