दिग्गज तेलुगू अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राव हे विविधांगी भूमिकांसाठी आणि दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखले जायचे. जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तेलुगू चित्रपट आणि रंगभूमीवर काम केलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म 10 जुलै 1942 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कंकीपाडू याठिकाणी झाला होता. त्यांनी 1978 मध्ये ‘प्राणम् खारीदू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी तब्बल 750 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तेलुगूसोबतच त्यांनी तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही काम केलंय. आंध्र प्रदेश सरकारद्वारे दिलं जाणारं अत्यंत प्रतिष्ठित ‘नंदी पुरस्कार’ त्यांनी नऊ वेळा पटकावलं आहे.
राव यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या. पडद्यावर ते ज्याप्रकारे खलनायकी भूमिका साकारायचे, ते पाहून प्रेक्षकांना खऱ्या आयुष्यातही त्यांची चिड यायची. परंतु हीच कामाची खरी पोचपावती असल्याचं ते मानत होते. रंगभूमीवरही त्यांनी उल्लेखनीय काम केलंय. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता रामचरणच्या ‘नायक’ या चित्रपटाील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती.
2015 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ने सन्मानित केलं होतं. बॉलिवूडमध्ये ‘सरकार’ या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘आपल्या बहुमुखी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन झालं. ही अत्यंत दु:खद बातमी आहे. जवळपास चार दशकांपासून ते चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांचं कलात्मक योगदान देत होते. त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील’, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.
राव यांच्या निधनाने तेलुगू सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं नायडूंनी म्हटलंय. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासावरही प्रकाश टाकला. 1999 मध्ये कोटा श्रीनिवास राव यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते 2004 पर्यंत विजयवाडाचे आमदार होते.