अमर्स रेकॉर्ड्स बँड बाडमेर बॉईजचे प्रमुख गायक म्हणून आपल्या मधुर आवाजासाठी ओळखले जाणारे राजस्थानी लोक गायक मांगे खान (Mangey Khan) यांचे बुधवारी निधन झाले. मांगे खान हे 49 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर नुकतीच बायपास सर्जरी करण्यात आली होती. संगीतकाराच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. मांगे खान यांनी देश-विदेशात आपल्या गायनाने नाव कमावले आहे.
डेन्मार्क, युनायटेड किंगडम, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इटली अशा जगाच्या कानाकोपऱ्यात ते आपले शो करत असे. अमर्स रेकॉर्ड्सचे संस्थापक आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, ‘मांगे यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून काढता येणार नाही. तो एक प्रिय मित्र आणि विलक्षण आवाज असलेला एक अद्भुत माणूस होता. एवढ्या कमी वयात त्यांचे दुःखद निधन केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संगीत जगताचेही मोठे नुकसान आहे.
आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, दवाखान्यात जाताना मांगे खान यांच्याशी त्यांचे बोलणे झाले होते. तेव्हा ते ‘मला बरे वाटत असून ऑपरेशननंतर भेटू,’ असं म्हणाले होते. शर्मा यांनी पुढे सांगितले की, 2010 मध्ये त्यांची मांगे खान यांच्याशी राजस्थानमधील एका गावात भेट झाली. इथून दोघांची मैत्री सुरू झाली.
आशुतोष शर्मा म्हणाले की, ‘आम्ही त्यांचा आवाज आणि गाण्याची शैली पाहून भारावून गेलो होतो. त्या संध्याकाळी आम्ही आमची पहिली दोन गाणी मांगेसोबत रेकॉर्ड केली, ‘चल्ला चल्ला’ आणि ‘पीर जलानी’, जी कोक स्टुडिओने रीमास्टर केली होती.