राजकीय मंडळींकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे, विकासकामांचे बॅनर झळकलेले आपण अनेकवेळा पाहिले असतील. मात्र डोंबिवलीतील एका अनोख्या उपक्रमाचा बॅनर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पुरुष आणि स्त्रियांना मोफत हेअर कलर करुन देण्याचा कार्यक्रम डोंबिवलीत पार पडला. त्याच्याच बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेली ही अनोखी स्टंटबाजी असल्याची चर्चा सुरू आहे.
राजकीय मंडळींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना, आणि प्रलोभनात्मक कार्यक्रम राबवले जातात. डोंबिवलीत लागलेल्या या अनोख्या आणि विचित्र वाटणाऱ्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि टीकेची लाट उसळवली आहे.
डोंबिवलीत ‘मोफत हेअर कलर शिबिरा’चे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन एका मराठी सिनेअभिनेत्रीच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक जनार्धन म्हात्रे, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा जनार्धन म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं.
या कार्यक्रमाची माहिती बॅनरच्या माध्यमातून देण्यात आली. 23 आणि 24 मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मोफत हेअर कलर उपक्रम प्रभागातील महिलांसाठी ठेवण्यात आला होता. या उपक्रमाचा लाभ शेकडो महिलांनी घेतल्याची माहिती आहे.