टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्थाचालकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्थाचालकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणाला चार दिवसांचा अवधी उलटलाय. असे असताना आरोपी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे परभणी पोलिसांकडून (Parbhani Police) आता त्यांच्या अटकेसाठी वाँटेड म्हणुन प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. परभणी पोलिसांकडून तसं पोस्टर आता जारी करण्यात आलं आहे. यांच्या बद्दल जो कुणी माहिती देईल त्याला बक्षीस ही देण्यात येईल, असे या पोस्टर मध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी (Parbhani Crime) असलेले संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या शोधासाठी एक विशेष पथक तर इतर 8 असे ऐकूण 9 पथक रवाना करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाथी लागलेले नाहीत. त्यामुळेच आज या प्रकरणातील मयत पालक जगन्नाथ हेंडगे यांचे गाव उखळद ग्रामस्थांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.

उखळद येथील गावकऱ्यांचा आज निघणार मोर्चा
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हट्टा परिसरात असणाऱ्या हायटेक निवासी शाळेमधील संस्थाचालकाकडून टीसी मागायला गेलेले पालक जगन्नाथ हेंडगे यांना उर्वरीत फीससाठी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे संतापलेल्या उखळद येथील गावकऱ्यांनी नुकतीच गावात बैठक घेऊन याविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आज (मंगळवारी 15 जुलै रोजी) हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात उखळद येथील सर्व गावकरी सहभागी होणार आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील नागरिकही या मोर्चामध्ये सहभागी होतील.

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असणार मोर्चा
परभणी शहरातील कृष्णा गार्डन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये आरोपी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीला तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *