परभणीतील तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी आज परभणी बंद

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळला होता. या काळात परभणीत जाळपोळ, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन कोठडीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असा आरोप होत आहे. आता न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या सगळ्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर दोषारोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात बंद पाळला जाणार आहे.

रामदास आठवलेंची महत्त्वाची मागणी
याप्रकरणाची कठोर चौकशी होणे आवश्यक आहे. गुन्हे शाखेच्यावतीने या प्रकरणाची तपासणी करावी. मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावे. सोमनथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मिळावेत. त्यासाठी रिपाईचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटेल. जे गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घ्यावेत, अशी मागणी आहे. निष्पाप लोकांना यामध्ये गुंतवू नये, ही आमची मागणी आहे. फुटेजमध्ये ज्यांचे फोटो दिसत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होऊ नये, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.

सचिन खरातांकडून महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन
परभणी प्रकरणात भीमसैनिकांना अटक करण्यात आली होती. या भीमसैनिकांमध्ये 35 वर्षीय युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेने पार पडावा, असे आवाहन रिपब्लकिन पार्टी खरात गट करत असल्याचे सचिन खरात यांनी म्हटले.

परभणीत चोख पोलीस बंदोबस्त
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आज परभणी बंदची हाक देण्यात आलेली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परभणी शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप हे परभणीत असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच आज आंबेडकरी अनुयायांकडून तसेच ज्येष्ठ नेत्यांकडून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात धरणे आंदोलन केले जाणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *