लेखणी बुलंद टीम:
बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेत इतिहास घडवला आहे. बांगलादेशने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. बांगलादेशने पाकिस्तानला रावळपिंडी कसोटीत ६ विकेट्सने पराभूत केलं. या पराभवासह बांगलादेशने २-० ने मालिका आपल्या नावे केली आहे. पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरूद्ध १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. ज्याप्रकारे बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्यांदा कसोटीत पराभूत करत इतिहास रचला त्यातप्रमाणे आता त्यांना कसोटी मालिका आपल्या नावे करत मोठा इतिहास रचला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २७४ धावा करत सर्वबाद झाले. ज्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. तर बांगलादेशचा संघ २६२ धावा करत सर्वबाद झाला. बांगलादेशकडून लिटन दासने १३८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर मेहदी हसनने ७८ धावांची निर्णायक खेळी केली. १२ धावांच्या आघाडीसह पाकिस्तानने आपला दुसरा डाव सुरू केला. पण संघ १७२ धावा करत सर्वबाद झाला. यासह बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान मिळाले होते जे बांगलादेशने ६ विकेट्स राखत सहज गाठले.