भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan War) तणावादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत-पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहे.
पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फतेह 1 क्षेपणास्त्रद्वारे (Fattah-1) पाकने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस, बियास एअर बेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला-
गेले दोन दिवस भारतावर भ्याड ड्रोन हल्ले करत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटांनी हादरल्याची माहिती समोर आली.
पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला-
एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकने केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला होता आणि भारतीय लष्कराने याचाच बदला घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. नूर खान, रफिक आणि मुरिद एअरबेस भारताकडून लक्ष्य करण्यात आलं आहे.
भारताचे पाकमधल्या चार विमानतळांवर हल्ले-
भारताकडून पाकिस्तानमधील चार विमानतळांवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानकडून देशातली सारी विमानतळं बंद करण्यात आली आहे. दुपारी बारापर्यंत देशभरातली हवाई वाहतूकच पाकिस्तानने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून पहाटे 3.15 वा.पासून हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पाकिस्तानकडून 26 शहरांना लक्ष्य-
शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलं. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली.