पाकिस्तान (Pakistan) ने अफगाणिस्तान (Afghanistan) मधील पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यावर हवाई हल्ले (Airstrikes) केले, ज्यात महिला आणि मुलांसह किमान 15 लोक ठार झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खामा प्रेसच्या अहवालानुसार, 24 डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानच्या हल्ल्यात लमानसह सात गावांना लक्ष्य करण्यात आले. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्य मारले गेले. बॉम्बस्फोटासाठी पाकिस्तानी विमाने जबाबदार असल्याचा दावा स्थानिक सूत्रांनी केला आहे. बरमालमधील मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हवाई हल्ल्याची चौकशी सुरू –
पाकिस्तानी हवाई हल्ल्याने तालिबान हैराण झाले आहेत. खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हवाई हल्ल्याची चौकशी केली जात असून त्याची पुष्टी करण्यासाठी आणि हल्ल्याची जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास करणे आवश्यक आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बर्मल, पक्तिका येथे हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांच्या भूमीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे.
पाकिस्तानने बाळगले मौन –
दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे हवाई हल्ल्याची पुष्टी केलेली नाही. परंतु लष्कराच्या जवळच्या सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, हा हल्ला सीमेजवळील तालिबानी स्थानांवर होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हवाई हल्ला झाला. पाकिस्तानी तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानी सैन्यावर हल्ले वाढवले आहेत.
हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू –
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वारेझमी यांनी पाकिस्तानचे दावे नाकारले. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं की, हवाई हल्ल्यात नागरिक, बहुतेक वझिरीस्तानी निर्वासित मारले गेले. या हल्ल्यात अनेक मुले आणि इतर नागरिक मारले गेले. आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह किमान 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.