संसारात विघ्न आलं की मग पती-पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयाचे दार ठोठावतात. ही बाब काय नवीन नाही. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये वीस वर्षांच्या संसारात वादाची ठिणगी पडली. यातून पत्नीनं न्यायालयात धाव घेत, पोटगीची मागणी केली. या रागातून पतीने अमानवी विकृतीचा कळस गाठला. पत्नी मुलांची कागदपत्रे घेण्यासाठी घरी आली. तेव्हा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले अन गुप्तांगात हळदी-कुंकू भरत त्यात लिंबू पिळले. असा धक्कादायक आरोप पत्नीने केलाय. यामुळं शहरातच नव्हे राज्यभर खळबळ उडालेली आहे. घटना वर्षभपूर्वीची असून याप्रकरणी पीडित पत्नीनं सांगवी पोलीस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल केलाय. हा संतापजनक प्रकार पिंपळेनिलखच्या विशालनगर मध्ये घडलाय. (Pune Crime news)
आरोपी पती आणि पीडित पत्नीचा विवाह 2004 मध्ये झाल. या दाम्पत्याला तीन मुले ही आहेत. दरम्यानच्या काळात पती-पत्नींमध्ये कौटुंबिक वादाला तोंड फुटलं होतं. अनेकदा हे वाद विकोपाला गेले अन काही काळात ते मिटले. मात्र, 2023 मध्ये झालेल्या खडाजंगीत हे दोघे विभक्त झाले. पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागल्या. त्यानंतर आरोपी पती हा पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला. मग पत्नीनं घटस्फोट आणि पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. यामुळं पती चांगलाच संतापला. अशातच जून 2024मध्ये मुलांची कागदपत्रे अन शाळोपयोगी वस्तू घेण्यासाठी पत्नी पतीच्या घरी गेली. तेव्हा पती दारूच्या नशेत होता. त्यावेळी ही पतीने पोटगी मागितली यावरून वाद घालायला सुरुवात केली अन अश्लील शिवीगाळ सुरु केली.
पत्नीनं त्याकडे दुर्लक्ष केलं अन अबोला ठेवला. मग पतीने धारदार शस्त्र दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले. तसेच गुप्तांगात हळदी-कुंकू भरून, त्यात लिंबू पिळले. आता मी तुझ्यावर जादूटोणा केलाय, आता तू वेडी होणार आहेस. पण मी तुझ्यासोबत जे काही केलं, याबद्दल कोणाला काही सांगितलं तर जीवे मारुन टाकेन. अशी धमकी ही दिली. असे पत्नीने फिर्यादीत आरोप केलेत. त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जून 2024मध्ये नेमकं काय-काय घडलं, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
गळ्यावर कोयता ठेवून धमकावलं अन् कपडे काढायला लावले
पत्नी आपल्या नवऱ्याच्या फ्लॅटमध्ये गेली तेव्हा महिलेची आई, मामी आणि मुलं सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. पत्नी घरात आल्यानंतर नवऱ्याने शिवीगाळ सुरु केली. मात्र, पत्नीने त्याकडे लक्ष दिले नाही. यावर पती आणखी संतापला. ‘मी बोलतोय, तरी माझ्याकडे बघत नाही’, असे म्हणत नवऱ्याने कोयता काढून बायकोच्या गळ्यावर ठेवला. त्यानंतर नवऱ्याने पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला सांगितले. त्यानंतर पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर घरातील हळद-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी आणल्या. या लिंबाच्या फोडी त्याने पत्नीच्या गुप्तांगात पिळल्या. आता मी तुझ्यावर जादूटोणा केलाय, आता तू वेडी होणार आहेस, असे त्याने म्हटले. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि तिचे कुटुंबीय घाबरले होते. अखेर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दीपक कांबळे यांना हा प्रकार सांगण्यात आला. कांबळे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर दीपक कांबळे पीडित महिलेला घेऊन सांगवी पोलीस ठाण्यात गेले आणि फिर्याद नोंदवली.