लेखणी बुलंद टीम:
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जाणारी अश्लीलता महिला अत्याचारांना आणि विकृती पसरवण्यास जबाबदार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या बाबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. अन्यथा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयांना घेराव घालण्याचा इशाराही जाधव यांनी दिल आहे.
लहान मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये विकृती निर्माण होत आहे ती या अश्लील कंटेंट मुळे होत आहे… त्यामुळे लोकभावना आणि पालकांची मागणी आहे यावरील हा अश्लील कंटेंटवर सेन्सॉर लावला पाहिजे, असं मत अविनाश जाधव आणि महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादरीकरण स्वातंत्र्यांच्या नावाखाली अश्लील, विभत्स आणि मर्यादा ओलांडणारी दृष्ये दाखवली जात असून ती संतापजनक असल्याचे अविनाश जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कुटुंबाने एकत्रित बसून बघण्यासारखी एकही कलाकृती सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नसल्याचे जाधव यांनी म्हटले. भावी पिढीवरील संस्कार मोडीत काढण्याचे षडयंत्र काही ठाराविक निर्मिती संस्था, निर्माते आणि वाहिन्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय संस्कृती रसातळाला नेण्याचा कुटील डाव परकीय खेळत आहे का, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर अन्यथा…
विषयाचे गांभीर्य समजून तात्काळ नेटफ्लिक्स , प्राईम टाईम, हॉट स्टार, आल्ट बालाजी यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक निर्बंध आणण्याची मागणी मनसेने केली आहे. ओटीटी वरील अश्लील वेब सीरीजवर सरकारने बंदी न घातल्यास नेटफ्लिक्स,बालाजी सारख्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयांवर घेराव घालण्याचा इशारा मनसेने दिला आहे.