अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला कडक इशारा दिला आहे.रशियानं यूक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवलं नाही तर त्यांना खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील , असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य बुधवारी कॅनडी सेंटरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना केलं आहे. एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता की जर राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी शुक्रवारी तुमच्या बैठकीनंतर देखील युद्ध थांबवण्यास सहमती दाखवली नाही तर रशियाला याचे परिणाम भोगावे लागतील का? यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट शब्दात उत्तर दिलं, ट्रम्प म्हणाले होय होणार, रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की हे परिणाम टॅरिफ पासून कडक प्रतिबंधापर्यंत असून शकतात. ट्रम्प यांनी म्हटलं की मला सविस्तर चर्चा करण्याची गरज नाही. मात्र, परिणाम खूप गंभीर असतील. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य 15 ऑगस्टला होणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत अलास्का येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते दुसऱ्या एका बैठकीचा प्रस्ताव ठेवतील,ज्यामध्ये यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की देखील सहभागी होतील. जर, पहिली बैठक चांगली झाली तर आम्ही दुसरी बैठक तातडीनं करु, मला वाटतं ही बैठकत तातडीनं व्हावी. पुतिन आणि झेलेन्स्की हे उपस्थित राहिले आणि माझी उपस्थिती आवश्यक असेल तर तिथं हजर राहीन, असं ट्रम्प म्हणाले. पहिल्या बैठकीत अपेक्षेप्रमाणं उत्तर मिळालं नाही तर दुसरी बैठक होणार नाही, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य यूरोपियन नेत्यांसोबत झालेल्या एका ऑनलाईन बैठकीनंतर आलं आहे. या बैठकीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं की सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया यूक्रेन युद्धात शस्त्रविराम देण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्या बैठकीतयूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं की पुतिन ब्लफ करत आहेत, आगामी शिखर बैठकीपूर्वी ते यूक्रेनच्या आघाडीवर सर्व ठिकाणांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न करतील. संपूर्ण यूक्रेनवर कब्जा मिळवण्यास समर्थ आहोत, असं रशियाला दाखवायचंय, असं यूक्रेनचे अध्यक्ष म्हणाले.
एपीच्या रिपोर्टनुसार ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक 15 ऑगस्ट, शुक्रवारी अलास्कात एका लष्करी तळावर होणार आहे. व्हाइटहाऊसच्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांची बैठक जॉइंट बेस एलमेंडॉर्फ रिचर्डसन मध्ये होणार आहे.