कांद्याची मागणी वाढलेली असताना पावसामुळे आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता असून, सणाच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे.
आवक घटल्याने दरवाढ
दोन महिन्यांपूर्वी घसरलेले कांद्याचे दर आवक घटत गेल्याने पुन्हा वाढू लागले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पुणे आणि नगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ५०० रुपये दर मिळत आहे. बाजारात रोज ५० ते ६० ट्रकची आवक होत आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत आवक कमी राहणार असून, त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जुन्याचा दर्जा चांगला
वखारीत साठवणूक केलेल्या जुन्या कांद्याची सध्या आवक सुरू आहे. या कांद्याचा दर्जा चांगला आहे. नोव्हेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू होते. तोपर्यंत जुनाच कांदा बाजारात असेल. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये प्रतिकिलो असून, दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
परराज्यांतून मागणी
कांद्याला परराज्यातून मोठी मागणी आहे. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांतून मागणी होत असल्याने मार्केट यार्डातून रोज ३० ते ४० गाड्या कांदा दक्षिण भारतात जात आहे. पुढील महिन्यात कर्नाटकात नवीन कांदा येणार आहे. त्यामुळे तेथून काही प्रमाणात मागणी कमी होईल. मात्र, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशातून मागणी कायम असणार आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचा दर पुढील तीन महिने तेजीत असेल, असे कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
बाजारातील कांद्याचे दर
कांदे घाऊक किरकोळ
एक किलो ५० रुपये ७० रुपये
१० किलो ५०० रुपये ७०० रुपये